डोळ्यांची नियमीत काळजी कशी घ्यावी ?

 

डोळ्यांची नियमीत काळजी कशी घ्यावी ?

डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. 'व्हिटॅमिन ए'युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल, तर नेत्रविकार रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळाने ए-बी-सी-डी वाचण्यास सुरुवात केली की, डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वयाची पहिली दहा वर्षे डोळ्यांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची आहेत. या वयात डोळ्यांची वाढ योग्य झाली नाही, तर ते कायमचे कमजोर होतात, 'लेझी आय'सारखे विकार उ‌द्‌भवू शकतात. त्यामुळे आईवडिलांनी मुलांच्या डोळ्याची नियमित तपासणी करवून घेण्यास प्राधान्य द्यावे.

अलीकडे 'स्क्रीन टाइम' वाढला आहे. संगणक, टीव्ही वा मोबाइलच्या वापरामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. त्यावर उपाय म्हणून एका तासाच्या कामानंतर डोळ्यांना किमान पाच मिनिटे विराम द्यावा. पापण्या लवण्याचे प्रमाण वाढवा. त्रास जास्त असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकंट आय ड्रॉप वापरू शकता. संगणकाच्या स्क्रीनला अँटीग्लेअर कोटिंग करावे अथवा अँटीग्लेअर चष्मा वापरण्यास हरकत नाही.

घराबाहेर पडताना डोळ्यांवर 'सनग्लासेस' अत्यावश्यक आहे. कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर हा वापर क्रमप्राप्तच आहे. अतिनील किरणांपासून ९९ ते १०० टक्के संरक्षण करणाऱ्या सनग्लासेस वापरण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा मोतिबिंदू अथवा मॅक्युलर डिजनरेशनसारखे डोळ्यांचे विकार उद्‌भवण्याची शक्यता वाढते. शिवाय सनग्लासेसमुळे धूळ आणि छोट्या कीटकांपासून रक्षण होईल.

डॉक्टरांच्या सल्ल्याविना, मेडिकल स्टोअरमधून घेतलेले आणि स्टिरॉइडसारखे घटक असणारे आयड्रॉप्स डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. फॅक्टरीमध्ये, वेल्डिंग आदी कामे करताना डोळ्यांची काळजी घ्यावी. योग्य काळजी न घेता काम करणे, हे डोळ्यांच्या दीर्घकालीन विकारांचे एक महत्त्वाचे कारण आहे.

मधुमेहाचा डोळ्यावर परिणाम होत असल्याने रुग्णांनी नियमित डोळ्याची चाचणी करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय चाळिशीनंतर जवळचा चष्मा लागण्याची शक्यता असल्याने नियमित डोळे तपासावे. वयाच्या पन्नाशीत काचबिंदू व मोतीबिंदू रोग होण्याची शक्यता वाढते. काचबिंदू तर 'सायलेंट किलर' आहे. हळुहळू मज्जातंतू कमकुवत झाल्याने दृष्टी कमी होऊन कायमचे अंधत्वदेखील येऊ शकते. त्यामुळे पन्नाशीनंतर डोळ्यांची तपासणी करणे, म्हणजे डोळ्यांची काळजी घेणेच होय.

डोळ्यांनी धूसर दिसत असेल, काम करताना डोळ्यांवर ताण पडत असेल, फोकस करण्यास त्रास होत असेल, डोळे कोरडे होत असतील, डोळे लाल असतील, तर डोळे तपासावे. कदाचित चष्मा लागू शकतो, नंबर बदलू शकतो किंवा कुठले अन्य विकार आहेत, हे कळू शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचारास सुरुवात होऊन पुढील गुंतागुंत टाळता येते.

आहारही समतोल असावा. वजनावर नियंत्रण असेल, तर डोळ्यावर कमी दबाव येतो; म्हणून वजन नियंत्रणात असावे. धूम्रपान टाळावे, नियमित व्यायाम करावा आणि मोठ्यांनी वर्षातून एकदा तर लहानांनी सहा ते आठ महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी.

डोळे फार अमूल्य आहेत. डोळ्यांच्या आजाराबाबत कुठलीही तडजोड करू नये, 'नंतर जाऊ नेत्ररोगतज्ज्ञाकडे...!' अथवा 'बघून घेऊ..काय होते...!' असा दृष्टिकोन ठेवू नये. डोळ्यांची नियमित काळजी घ्या आणि दृष्टीचे रक्षण करा.


OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Post a Comment

0 Comments